कोलकाता : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आशिष नेहरा आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु होत असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीत तो समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान आशिष नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आता समालोचक म्हणून क्रिकेटशी जोडला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून कोलकात्यातून सुरुवात होत आहे.
वीरेंद्र सेहवागने नेहराचं समालोचक म्हणून स्वागत केलं आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात, दुसरी कसोटी 24 नोव्हेंबरपासून नागपुरात आणि तिसरी कसोटी 2 डिसेंबरपासून दिल्लीत खेळवली जाणार आहे.
आशिष नेहरा मोहम्मद अझरुद्दीनपासून ते विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळला आहे. शिवाय महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वातही तो खेळला आहे. विराट कोहली दहा वर्षांचा असताना नेहराने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.