Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास रचणारा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. नीरजने फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये हा विक्रम केला आहे. नीरजने या स्पर्धेत 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षाही सरस ठरली. मात्र, नीरजला या स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 


ऑलिम्पिकनंतर जवळपास 10 महिन्यानंतर नीरज चोप्रा एका स्पर्धेत सहभागी झाला. ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने 86.92 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.30 मीटर थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात 85.85 मीटर इतकाच थ्रो फेकता आला. 


 






फिनलँडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने 88.02 मीटर आणि 80.36 मीटर अशी कामगिरी नोंदवली. 


नीरज चोप्रा हा फिनलँडमधील वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये सहभागी झाला होता. जागतिक पातळीवर डायमंड लीगनंतरची ही प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. 


चोप्राचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी  मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. त्याने 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले. फिनलँडमधील स्पर्धेतील कामगिरीमुळे नीरजचा आत्मविश्वास दुणावला असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.