World Athletics Championships 2022 : ऑलिम्पिक (Olympic) सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल 19 वर्षानंतर नीरजनं भारताला पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत त्याला सुवर्णपदकावर नाव कोरता आलं नाही, मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. नीरज चोप्राची पहिली भालाफेक फाऊल ठरली, मात्र त्यानंतर त्यानं जोरदार मुसंडी मारत चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भाला फेकत रुपेरी कामगिरी केली. ग्रेनेडाच्या अँडर्सन पीटर्सनं 90.46 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक पटकावलं. 2003 साली अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक जिंकलं होतं. मात्र त्यानंतर भारताच्या एकाही अॅथलीटला पदक जिंकता आलं नव्हतं, मात्र नीरजनं यंदा पदक जिंकत भारताचा या स्पर्धेतला पदकांचा दुष्काळ संपवला आहे.


जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य भरारी घेतल्यानंतर नीरजनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "वाऱ्याचा वेग आज माझ्या विरोधात होतात. त्यामुळे मला फारशी चांगली सुरुवात करता आली नाही. चौथ्या फेरीत मात्र मला पुनरागमन करता आलं. पण त्यानंतर मांडीला वेदना जाणवल्यामुळे फारच अवघड झालं. पाचव्या आणि सहाव्या फेरीत मी प्रयत्न केले, पण त्यात मला फारसं यश आलं नाही. पण तरिही मी खूश आहे. मला रौप्य पदक मिळालं आहे. मी पुढे आणखी प्रयत्न करिन. पुढल्या वर्षी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. त्यासाठी मी पुन्हा जोमानं तयारी करिन." 


पाहा व्हिडीओ : भारताच्या 'गोल्डन बॉय'ची रौप्य भरारी



जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या अँडर्सन पीटर्सचं नीरजनं तोंडभरुन कौतुक केलं. तो म्हणाला की, "पीटर्सनं मला कडवी झुंज दिली. त्यानं प्रत्येक प्रयत्नात उत्तम कामगिरी केली. मीसुद्धा माझे पूर्ण प्रयत्न केले, पण सुवर्णपदक मिळवता आलं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यात वाऱ्याचाही वेग विरुद्ध दिशेनं होता. त्या परिस्थितीतही पीटर्सनं तब्बल 90 मीटर्सपर्यंत भाला फेकला. पाहताना वाटतं की, 90 मीटर्स भाला फेकणं अत्यंत सोपं आहे, पण तसं अजिबातच नाही. दरम्यान, पीटर्सनं सलग दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूला नमवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. 


महत्त्वाचं म्हणजे, भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं तोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तेव्हापासूनच अवघ्या देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच तब्बल 19 वर्षांनी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरत नीरज देशवासियांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहेच, पण त्यानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळही संपवला आहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारा नीरज चोप्रा दुसरा खेळाडू ठरला आहे, तर रौप्य पदक पटकावणारा पहिला अॅथलिट आहे. यापूर्वी 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक जिंकलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :