केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2017 03:20 PM (IST)
50-50 षटकांच्या या सामन्यात नागालँडचा संघ 17 षटकं खेळून केवळ दोन धावा करू शकला.
बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात केरळनं नागालँडचा डाव अवघ्या दोन धावांत गुंडाळला. 50-50 षटकांच्या या सामन्यात नागालंडचा संघ 17 षटकं खेळून केवळ दोन धावा करू शकला. त्यानंतर या सामन्यात केरळनं पहिल्याच चेंडूवर विजय साजरा केला आणि नागालँडचा 299 चेंडू आणि दहा विकेट्स राखून धुव्वा उडवला. या सामन्यात नागालँडच्या दहाही विकेट्स दोन धावांवर पडल्या. नागालँडने ज्या दोन धावा केल्या, त्यामध्ये एक धाव सलामीची फलंदाज मेनकाने केली, तर दुसरी धाव सहाव्या षटकात वाईडने मिळाली. केरळच्या 5पैकी 4 गोलंदाजांनी एकही धाव दिली नाही. मिन्नू मणीने 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये 11 व्या षटकात तीने 3 विकेट्स घेतल्या. मिन्नूने 4-4-0-4 म्हणजेच चार षटकात, चारही निर्धाव, शून्य धावा आणि चार विकेट्स घेतल्या. नागालँडच्या या लाजीरवाण्या कामगिरीबाबत त्या संघाचे प्रशिक्षक होकैतो झिमोमी म्हणाले, “आमच्या संघाचं प्रशिक्षण सप्टेंबर महिन्यात सुरु झालं. मात्र पाऊस असल्यामुळे प्रशिक्षण होऊच शकलं नाही. मी स्वत: संघाचं प्रशिक्षकपद सप्टेंबरमध्येच स्वीकारलं. मात्र संघबांधणीच होऊ शकली नाही”