उस्मानाबाद : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मान्सूनचं आगमन उशिरा होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांचा वर्तवली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. मात्र किमान 8 जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.


मान्सूनचं अंदमानमध्ये आगमन झालं आहे. मात्र त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. तर राज्यात 8 जूनच्या आधी मान्सून-पूर्व पावसाची शक्यता नाही.


मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या चिंता यामुळे वाढणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नसून शेतीची कामे पूर्व करून घ्यावीत आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार शेतीचे पुढचे नियोजन करावं, असं कृषी विभागानं आवाहन केलं आहे.


मान्सून लांबल्याने उष्णतेची तीव्रत कायम राहणार आहे. 1 जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


VIDEO | देशात सरासरीच्या 93 टक्केच पाऊस पडण्याची शक्याता, स्कायमेटचा अंदाज 



12 जूनला मान्सून महाराष्ट्रात : स्कायमेट


हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था 'स्कायमेट'ने देखील मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तर केरळमध्ये मान्सून 4 जूनला दाखल होत असल्याने 12 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला.


यंदा देशात सरासरीच्या 93 टक्केच पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी असेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. यंदा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात फार बरी नसेल, असेही सांगण्यात आले आहे.