मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटर कृणाल पांड्या विवाहबंधनात
एबीपी माझा वेब टीम | 28 Dec 2017 08:53 PM (IST)
मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिएट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कृणालचा लग्नसोहळा झाला. बुधवारी सकाळीच दोघांचा साखरपुडा झाला.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंसाठी सध्या लग्नाचा मौसम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील ऑलराऊंडर क्रिकेटपटू कृणाल पांड्याने लगीनगाठ बांधली. कृणाल गर्लफ्रेण्ड पंखुडी शर्मासोबत मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या विवाहाने क्रिकेटपटूंच्या लग्नाच्या सीझनला सुरुवात झाली. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, विराट कोहली-अनुष्का शर्मा अशी क्रिकेटपटूंची रांगच लागली. त्यानंतर कृणालही बुधवारी, 27 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकला. कृणाल हा टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे. मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिएट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कृणालचा लग्नसोहळा झाला. बुधवारी सकाळीच दोघांचा साखरपुडा झाला. लग्नाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे रोहित शर्मा, केएल राहुल, इरफान पठाण, पार्थिव पटेल, किरण मोरेही या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीणबाई नीता अंबानी, मुकेश अंबानी, सुपरस्टार अमिताभ बच्चनही लग्नाला उपस्थित होते.