मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं. पण या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने बरीच झुंज दिली. यावेळी मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू मयांक मार्कंडे याने चांगलीच छाप सोडली. अवघ्या दोनच सामन्यात चमकदार कामगिरी करणारा 20 वर्षीय मयांक सध्या मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू बनला आहे.


काल (गुरुवार) सनरायजर्स हैदराबादने मुंबईवर अवघा एक गडी राखून विजय मिळवला. पण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. सुरुवातीला हैदराबाद हा सामना एकहाती जिंकू शकेल अशी परिस्थिती होती. पण मयांकने हैदराबादच्या चार फलंदाजांना माघारी धाडून मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

शिखर धवन, रिद्धीमान साहा, मनीष पांडे आणि शकीब अल हसन या चार बड्या खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवून मयांकने सामना मुंबईच्या बाजूने झुकवला होता. यावेळी त्याने आपल्या चार षटकात फक्त 23 धावा देऊन चार गडी बाद केले होते. मात्र, मयांकच्या या कामगिरीला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईला पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यातही मयांकने 4 षटकात तीन बळी घेतले होते. वेगवान गुगली आणि व्हेरिएशन यामुळे मयांक फलंदाजांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळे मयांक आता प्रतिस्पर्ध्यांसाठी सरप्राईज पॅकेज ठरत आहे.

एकाच सामन्यात चार गडी बाद करणारा मयांक हा आयपीएलमधील कमी वयाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. दोन सामन्यात मयांकने 7 बळी घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही सामन्यात मयांकचा दबादबा दिसून आला आहे. अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी मयांकने आयपीएल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरुन सुरुवात केली आहे.