बंगळुरु: आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रविवारी पुण्याचा अंतिम सामना मुंबईशी होईल. बंगळुरूत खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर टू सामन्यात मुंबईनं कोलकात्याचा सहा विकेट्सनी पराभव केला.
या सामन्यात मुंबईच्या प्रभावी आक्रमणासमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी अवघ्या 107 धावांत लोटांगण घातलं. त्यामुळं मुंबईसमोर विजयासाठी 108 धावांचंच लक्ष्य होतं.
कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पंड्यानं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 54 धावांच्या भागिदारीनं मुंबईला विजयपथावर नेलं. कृणाल पंड्यानं 30 चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद 45 धावांची आणि रोहित शर्मानं 24 चेंडूंत 26 धावांची खेळी केली.
त्याआधी, मुंबईच्या कर्ण शर्मानं 16 धावांत चार आणि जसप्रीत बुमरानं सात धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. मिचेल जॉन्सननं 28 धावांत दोन विकेट्स काढून त्यांना छान साथ दिली.
सूर्यकुमार यादव आणि इशांक जग्गी यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 56 धावांच्या भागिदारीमुळं कोलकात्याला 107 धावांची मजल मारता आली. पण क्वालिफायर टूचा सामना जिंकण्यासाठी ती धावसंख्या पुरेशी ठरली नाही.