पुणे : पुण्यातल्या हायवेलगतच्या दारुबंदीवरुन महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन दारुबंदी कायम रहावी, अशी मागणी केली आहे.

महापौरांची ही भूमिका महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या भुमिकेच्या विरुद्ध असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.



काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या परिसरात दारु विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले होते. हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारला पत्र पाठविले होतं.

या घडामोडीच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरात हे रस्ते येता कामा नये. यासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या वतीनं पुणे महापालिकेत भजन करीत आणि पालकमंत्र्याच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून आंदोलन करण्यात होतं.

त्यानंतर काल महापौर मुक्ता टिळक यांनी महामार्गावरील 500 मीटर हद्दीतील दारुबंदी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास प्राधान्य द्यावे, अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितिन कालजे यांनीही त्यांच्या पालिका हद्दीतील महामार्ग अ वर्गीकृत करवेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे दारुबंदीच्या मुद्द्यावरून भाजपमधे दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान, दारूबंदीवरून मुक्ता टिळक आणि आमच्यामध्ये काहीच मतभेद नसल्याचं गिरीश बापटांनी सांगितलं आहे.