Prithvi Shaw :  अवघ्या काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या विजेतेपदावर मुंबईच्या संघाने नाव कोरलं. या स्पर्धेत पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) बऱ्याचदा चांगली सुरुवातही केली. पण फार मोठी खेळी त्याला खेळता आली नाही. त्यामुळे आता विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेमध्ये त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयावर पृथ्वीने अगदी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता एमसीएकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. तसेच पृथ्वीच स्वत:चा शत्रू ठरला असल्याचंही यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हटलं आहे. 


विजय हजारे स्पर्धेनंतर पृथ्वीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हलं होतं, ‘देवा, आणखी किती परीक्षा पाहणार आहेस,’ तसेच त्याने त्याची कामगिरी अधोरखित करत म्हटलं होतं की, ‘मी आणखी काय केलं पाहिजे? पृथ्वीच्या या प्रतिक्रियेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननेही स्पष्टीकरण दिलं आहे. पृथ्वीने शिस्त पाळून स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं यावेळी पृथ्वीने म्हटलं आहे. 


मुंबई किक्रेट असोसिएशनकडून स्पष्टीकरण


पृथ्वी शॉच्या निर्णयावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, मुश्ताक अली स्पर्धेत आम्ही जवळपास 10 फिल्डर्ससोबतच खेळत होतो, अशी परिस्थिती होती. मैदानावर पृथ्वीच्या बाजूला चेंडू गेला तरी त्याला तो अडवणं जड जात होतं. फलंदाजी करतानाही शरीरापासून दूर असलेला चेंडू मारणं त्याला शक्य होत नव्हतं. त्याची तंदुरुस्ती, शिस्त आणि वागणं हे सध्या फार वाईट आहे.


पुढे त्यांनी म्हटलं की, संघातील वरिष्ठ खेळाडूंकडूनही पृ्थ्वीबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान तो अनेकदा रात्रभर पार्टी करायचा आणि सकाळी हॉटेलवर यायचा. अनेकदा त्याने सरावाला देखील दांडी मारल्याची माहिती आहे. एक क्रिकेटपटू म्हणून त्याचा कामगिरी सर्वांनाच माहिती आहे. पण आता तो स्वत:च स्वत:चा शत्रू ठरलाय. त्यासाठी त्याने इतर कुणालाही दोष देऊ नये.  दरम्यान विजय हजारे स्पर्धेतून वगळल्यानंतर पृथ्वीने व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीवरही मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून स्पष्टीकरण आलं आहे. याचा आता काही फायदा आहे का? अशा पोस्टमुळे निवड समिती किंवा एमसीएचा निर्णय बदलणार आहे का? असे प्रश्न मुंबई क्रिकेट असोसिएशनने उपस्थित केले आहेत. 


अगदी सुरुवतीपासून उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचं बेशिस्त वागणं आणि व्यायामाच्या बाबतीतल्या त्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच मुंबईच्या रणजी संघातूनही पृथ्वीला काढून टाकण्यात आलं होतं. इतकच नव्हे तर आयपीएलच्या लिलावतही त्याला कुणी खरेदी केलं नाही. त्यामुळे एका चांगल्या क्रिकेटरचा प्रवास हा अवघ्या काही मैलांवरच संपला का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय.