Rohit Sharma Wankhede Stadium मुंबई: रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत प्रामुख्यानं घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे. तर, वनडे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. रोहित शर्माच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं नाव देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रँड स्टँड लेवल 3 स्टँडला शरद पवार यांचं नाव दिलं जाईल. तर, ग्रँड स्टँड लेवल 4 ला अजित वाडेकर यांचं नाव दिलं जाईल. दिवेचा पॅवेलियन लेवल 3 रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मिलिंद नार्वेकर यांनी मांडले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला अनुमोदन दिलं.
याबैठकीत एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांना आदरांजली वाहण्यात आली. आता एमसीएस पॅव्हेलियनमधील मॅचडे ऑफिसं नाव बदलून एमएसीए ऑफिस लाउंज करण्यात आलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे इतर निर्णय
मुंबई क्रिकेट असोसिएशनची 86 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबईतील क्रिकेटच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई क्रिकेट क्लबशी संलग्न असलेल्या क्लबला दिला जाणारा निधी 75 कोटी करण्यात आला. पुढच्या काळात तो 100 कोटी करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. मुंबईतील क्रिकेटच्या आणि त्यांसदर्भातील सोयी सुविधांच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला.
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आमचे आजचे निर्णय मुंबई क्रिकेटच्या आधारस्तंभांविषयी आदर दर्शवतात असं म्हटलं.
वानखेडेवर सचिन तेंडुलकरच्या नावे यापूर्वीच स्टँड
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या नावे यापूर्वीच स्टँड आहेत. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर विराट कोहलीच्या नावे स्टँड आहे. कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर सौरव गांगुलीच्या नावे स्टँड आहे.तर, बंगळुरुत राहुल द्रविडच्या नावे स्टँड आहे.
रोहित शर्मानं टीम इंडियाला ज्या प्रकारे टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे. त्याप्रमाणं मुंबई इंडियन्सला देखील पाच वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिलं आहे. आता त्याचं नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला दिलं जाणार आहे.