मुंबई : गेल्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून भाजपचे (BJP) संघटन पर्व जोमाने सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यातच, आज 2 माजी आमदार आणि वडिल मंत्री राहिलेल्या हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात श्रीरामपूरमधील माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसमधील 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. कोल्हापूर, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस, युबीटी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. तर, साताऱ्यातही रामराजे निंबाळकर गटाला भाजपाकडून धक्का देण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात हे पक्ष प्रवेश झाले आहेत.
भाजपमधील पक्षप्रवेशावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसमध्ये 7 वर्षे मंत्री राहिलेल्या बळीराम हिरे यांच्या परिवारातील प्रशांत हिरे यांचा आज भाजपात प्रवेश झाला आहे. मालेगावातील हिरे कुटुंब यांचं राजकीय क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांसह, कोल्हापूरमधील माजी आमदार संजय घाडगे हेही भाजपात आले आहेत. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनीही भाजपचे कमळहाती घेतलं आहे. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसमधील 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला., शिवाजी देशमुख यांचाही प्रवेश झालाय, या सर्वांचे मी पक्षात स्वागत आणि अभिनंद करतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. तसेच, पुढील काळात काँग्रेसमधून 2 मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडणार आहे, तसेच काही आश्चर्यचकित करणारे 2-3 पक्षप्रवेश देखील काँग्रेसमधून होतील, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय. आमचा पक्षात 1 कोटी 51 लाख प्राथमिक सदस्य आहेत. तसेच, यापुढेही 50 लाख मेंबरशिप आम्ही वाढणार आहोत. महाविकास आघाडीला हे मोठं खिंडार आहे, अजून काही पक्षप्रवेश मेळाव्यादरम्यान होतील. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे राजकारण घराघरात भांडणं लावणे, परिवार तोडणे याआधारावर आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे कधीही राजकारण त्यांनी केलं नाही. मोदीजी आणि देवेंद्रजींनी विकासाचा संकल्प केला. काही लोकं अजित दादा, एकनाथ शिंदेंकडे जातायत कारण विकासाचे राजकारण होत आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले.
साताऱ्यातही काँग्रेसला धक्का
साताऱ्यातील रामराजे निंबाळकर गटाला फलटणमध्ये भाजपनेच जोरदार धक्का दिला असून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. तर, माजी नगरसेविका मधुबाला भोसले यांनीही शरद पवार गटाला रामराम केला आहे. दिलीप सिंह भोसले व मधुबाला भोसले यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे.
