रांची : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या दोन फ्लॅट्सचा लिलाव होणार आहे. धोनीचे फ्लॅट्स असलेल्या
झारखंडमधील इमारतीच्या बिल्डरला कर्ज चुकवता न आल्यामुळे 'हुडको' (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा लिलाव करणार आहे.

रांचीतील डोरंडा भागात हॉटेल युवराजजवळ 'शिवम प्लाझा' नावाची इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये धोनीच्या नावे अकराशे आणि नऊशे चौरस फूट क्षेत्राचे फ्लॅट्स आहेत. बिल्डर दुर्गा डेव्हलपर्स हुडकोचं सहा कोटी रुपयांचं कर्ज चुकवू न शकल्यामुळे पूर्ण प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे धोनीलाही याची झळ सोसावी लागत आहे.

शिवम प्लाझाच्या लिलावाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अलाहाबादमधील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने लिलावाची आधार किंमत निश्चित करण्याची सूचना दिली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम हुडकोच्या खात्यात जमा होणार आहे.
धोनीच्या फ्लॅटसह विक्री झालेल्या सर्व फ्लॅट्सचा लिलावात समावेश होणार आहे.

दुर्गा डेव्हलपर्सने 'शिवम प्लाझा'साठी हुडकोकडून 12 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 'ग्राऊण्ड प्लस 10' अशी या इमारतीची रचना होती. जमिन मालकाचा दुर्गा डेव्हलपर्ससोबत वाद झाल्यामुळे सहा कोटींचं कर्ज दिल्यानंतर हुडकोने उर्वरित कर्जाची रक्कम देणं थांबवलं. त्यामुळे सहा मजल्यांनंतर बांधकाम स्थगित झालं. कर्जाची रक्कम परत करण्यास दिरंगाई केल्यामुळे हुडकोने 'दुर्गा डेव्हलपर्स'ला काळ्या यादीत टाकलं.

धोनीने 'शिवम प्लाझा'मध्ये तीन मजल्यांवर फ्लॅट्स खरेदी केले होते. त्यापैकी दोन मजल्यांवरील फ्लॅट्स दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तळ मजल्यावरील दोन फ्लॅट्ससाठी धोनीने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.