मुंबई : महेंद्रसिंह धोनी कर्णधार म्हणून आज शेवटचा सामना खेळणार आहे. भारत 'अ' आणि इंग्लंड संघांमधील पहिला सराव सामना आज मुंबईत खेळवला जाणार आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः महेंद्रसिंह धोनी भारत 'अ' संघाचं नेतृत्त्व करणार आहे.


महेंद्रसिंह धोनीने गेल्या बुधवारीच कर्णधारपद सोडण्याचा आणि टीम इंडियात केवळ यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीचा राज्याभिषेक झाला.

त्यामुळे भारत 'अ' संघाचा इंग्लंडविरुद्धचा सराव सामना, म्हणजे एका आंतरराष्ट्रीय टीमसमोर धोनीला नेतृत्त्व करताना पाहण्याची अखेरची संधी ठरु शकते.

दरम्यान, मागील 70 दिवस स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीसाठी हा सराव सामना म्हणजे त्याची बॅट परजून पाहण्याचीही नामी संधी आहे.