मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला सैन्यात प्रशिक्षणाची परवानगी मिळाली आहे. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी धोनीची विनंती मंजूर केली आहे. आता तो पॅराशूट रेजिमेंटमध्ये दोन महिन्यांचं प्रशिक्षण घेणार आहे. हे प्रशिक्षण जम्मू काश्मीरमध्ये होऊ शकतं, परंतु धोनी कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. महेंद्रसिंह धोनी टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे.


आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगत महेंद्रसिंह धोनीने दोन महिन्याचा ब्रेक घेतला आहे. धोनीने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्याच्याऐवजी संघात युवा खेळाडू रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. धोनी आता सैन्यात पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेणार आहे.

महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर सैन्यात दाखल होणार? सियाचिनमध्ये काम करण्याची इच्छा


वर्ल्डकपमधील कामगिरीवरुन टीका
विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीने 8 सामन्यात 273 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीवरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विशेषत: संथ फलंदाजीवरुन त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सध्यातरी क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार नसल्याचं धोनीने सांगितलं.

कधी निर्णय घ्यायचा हे धोनीला ठावूक आहे : एमएसके प्रसाद
धोनीच्या निवृत्तीबाबत भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद  म्हणाले की, धोनी महान खेळाडू आहे. याबाबत कधी निर्णय घ्यायचा हे त्याला ठावूक आहे. निवृत्ती घेणं त्याचा खासगी निर्णय आहे आणि त्याच्यावर कोणताही दबाव नाही. तर व्यवस्थापनाला धोनीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही, असं कर्णधार विराट कोहलीने याआधीच स्पष्ट केलं होतं.

2011 मध्ये लेफ्टनंट कर्नल पद
भारतीय सैन्याने 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल हे मानद पद दिलं होतं. लहानपणापासूनच फौजी बनण्याची माझी इच्छा होती. रांचीच्या कँट परिसरात मी कायम फिरायला जात असे, असं धोनीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. परंतु नशिबाला हे मंजूर नव्हतं. तो फौजी बनला नाही पण क्रिकेटर बनला. मात्र यानंतर लेफ्टनंट कर्नल हे मानद पद मिळाल्यानंतर त्याची सैन्यात जाण्याची काही प्रमाणात का होईना पूर्ण झाली.