सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेनं सेन्चुरियनच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ धावांचं आव्हान दिलं होतं. जेपी ड्युमिनी आणि हेन्रिच क्लासेननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ९३ धावांच्या भागिदारीनं दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं.
या पराभवानंतरही एक गोष्ट टीम इंडियासाठी दिलासादायक ठरली. ती म्हणजे धोनी आपल्या जुन्या लयीत दिसून आला. यावेळी धोनीने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.
पण याचवेळी मैदानावर धोनीच्या एका कृतीनं सारेच अवाक् झाले. शांत आणि संयमी अशी धोनीची खरी ओळख पण काल एका क्षणी धोनी आपला संयम गमावून बसला आणि तेच कॅमेऱ्यातही कैद झालं.
भारतीय संघाने 19.1 षटकामध्ये 171 धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि मनिष पांडे खेळत होता. त्यावेळी दोन्ही फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते. 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनिष पांडेन फटकावलेल्या चेंडूवर धोनीनं दोन धावांचा कॉल दिला. मात्र, मनिष पांडेनं त्याकडे लक्ष न देता आरामात एकेरी धाव घेतली. यामुळेच धोनी त्याच्यावर प्रचंड भडकला.
कायम शांत आणि संयमी असणाऱ्याने धोनीने यावरुन भर मैदानाताच पांडेला सुनावलं. 'उधर क्या देख रहा है, इधर देख ले.' अशा शब्दातच धोनीनं त्याला दरडावलं. धोनीचा हा आक्रमकपणा पाहून पांडेही काही काळ भांबावून गेला होता. पण आपली चूक झाल्याचंही त्यावेळी त्याच्या लक्षात आलं.
दरम्यान, या सामन्यात मनिष पांडे आणि धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 188 धावांपर्यंत मजल मारली होती. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना जुना धोनी पाहायला मिळाला होता. दुसरीकडे मनिष पांडेने देखील 48 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या.