सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेने सेन्चुरियनच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. जेपी ड्युमिनी आणि हेन्रिच क्लासेनने तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं. क्लासेनने तीन चौकार आणि सात षटकारांसह 69 धावांची खेळी उभारली. ड्युमिनीने चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 64 धावांची खेळी केली.

भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल कालच्या सामन्यातला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांमध्ये एकही विकेट न घेता 64 धावा दिल्या. जयदेव उनाडकट 2 आणि शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताच्या अपेक्षा शेवटपर्यंत जिवंत होत्या, कारण भारताकडे असा गोलंदाज होता, ज्याने संपूर्ण मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंजाजांना चेंडू समजू दिला नाही. मात्र 19 व्या षटकात जे घडलं, त्याची कुणालाही अपेक्षा नव्हती.

19 व्या षटकात नेमकं काय घडलं?

18 व्या षटकानंतर दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती 4 बाद 173 अशी होती. त्या वेळी कर्णधार जेपी ड्युमिनी आणि फरहान बेहारदीन खेळपट्टीवर होते. कर्णधार विराट कोहलीने 19 व्या आणि निर्णायक षटकाची जबाबदारी जयदेव उनाडकटवर सोपवली. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 12 चेंडूत 16 धावांची गरज होती.

जयदेवने पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर बेहारदीनने दोन धावा घेतल्या. त्याने पुढचा चेंडू डॉट टाकण्याच्या नादात तो वाईड टाकला. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विनाकरण एक धाव मिळाली.

दक्षिण आफ्रिकेला आता 11 चेंडूत 13 धावांची गरज होती. बेहारदीनने या चेंडूवर एक धाव घेतली आणि कर्णधार जेपी ड्युमिनीला स्ट्राईक दिली.

आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 चेंडूत 12 धावांची गरज होती. जयदेवने हे षटक टाकल्यानंतर पुढच्या षटकात भुवनेश्वर कुमार दक्षिण आफ्रिकेला रोखेल, अशी अपेक्षा होती. मात्र 19 व्या षटकात तेच झालं, ज्याची भीती होती. जयदेवने ड्युमिनीला फुल टॉस चेंडू फेकला, ज्यावर ड्युमिनीने संधीचं सोनं करत षटकार ठोकला.

आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ 6 धावांची अपेक्षा होती. पुढचा चेंडू जयदेवने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ओव्हर पिच पडला आणि ड्युमिनीने यावरही षटकार ठोकला. या षटकारासोबतच दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.