लंडन : इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना गमावत भारतानं एकदिवसीय मालिकाही 2-1नं गमावली. भारताने दिलेलं 257 धावांचं आव्हान इंग्लंडनं सहज पार केलं. इंग्लंडने 44.3 षटकात 8 गडी राखून हा सामना जिंकला.


सामना गमावल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. ही नुसती अफवा नसून धोनीने आपल्या कृतीतून तसे संकेत दिले आहेत. कालचा सामना संपल्यानंतर खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना धोनीने पंचाकडून सामन्यातील चेंडू घेतला.





पंचांकडून चेंडू घेतानाचा धोनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारावर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे अंदाज अनेकांकडून बांधले जात आहेत.


धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना असंच केलं होतं. धोनीचा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. सामना संपल्यानंतर धोनीने अंपायरकडून मैदानातील स्टंप्स घेतले होते आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केलं होतं. म्हणून कालच्या सामन्यात पंचाकडून चेंडू घेऊन धोनी निवृत्तीची घोषणा करणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.


धोनीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.


महेंद्रसिंह धोनीला इंग्लंड दौऱ्यात आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. धोनीने इंग्लड दौऱ्यात दुसऱ्या सामन्यात 59 चेंडूत 37 धावा केल्या, तर तिसऱ्या सामन्यात 66 चेंडूत 42 धावांची खेळी केली. आपल्या विस्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीच्या संथ खेळीमुळे तो इंग्लंड दौऱ्यात टीकेचा धनी बनला.


 

संबधित बातम्या

भारताचा दारुण पराभव, वन डे मालिकाही गमावली

विराटच्या त्रिफळा उडवणारा आदिल रशिद म्हणतो...