नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने धोनीविरोधात आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये सुरु असलेला खटला रद्द केला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धोनीविरोधात खटला सुरु होता.

एका बिझनेस मॅग्झिनच्या कव्हरपेजवर धोनी भगवान विष्णूच्या रुपात दिसला होता. त्याप्रकरणी धोनीला कोर्टाने अटक वॉरंटही जारी केलं होतं.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2013 मधील आहे. एका बिझनेस मासिकाच्या कव्हर पेजवर महेंद्रसिंह धोनीला भगवान विष्णूच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. विष्णूच्या अवतारातील धोनीच्या हातात बुटांसह अनेक वस्तू दिसत होत्या.

त्यामुळे भावना दुखावल्याप्रकरणी याविरोधात विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कर्नाटक उच्च न्यायालयाने तर धोनीला चांगलंच फटकारलं होतं. पैशांसाठी हिंदू देवतांना चुकीच्या पद्धतीने सादर केल्याने उच्च न्यायालयाने धोनीला खडेबोल सुनावले होते.

धोनीने परिणामांचा विचार न करता फक्त पैशांसाठी जाहिरातीच्या कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली. मात्र यामुळे हिंदू देवतांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं, असं सांगत न्यायालयाने अशा प्रवृत्तीवर सडकून टीका केली होती.

धोनीसारख्या क्रिकेटर किंवा सेलिब्रिटींना जनतेच्या धार्मिक भावनांना दुखवण्याचा परिणाम माहित असायला हवा. त्यांना अशाप्रकारच्या जाहिराती करण्यापूर्वी त्यांनी होणाऱ्या परिणामांचा विचार करायला हवा, असं न्यायालयाने त्यावेळी म्हटलं होतं.

संबंधित बातमी

महेंद्रसिंह धोनी भगवान विष्णुच्या रुपात, कॅप्टन कूलला उच्च न्यायालयाची फटकार

'त्या'साठी कॅप्टन कूल धोनीने ठोठावला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा...


महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट