चेन्नई : दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या टीम इंडियाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने धीराच्या शब्दांचा दिलासा दिला आहे.


या पराभवांनंतरही टीम इंडियाच्या कामगिरीतल्या उल्लेखनीय बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सांगून धोनीने भारतीय गोलंदाजाच्या कामगिरीची प्रशंसा केली.

भारतीय गोलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वीस-वीस विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या वीस विकेट्स घेणं आवश्यक असतं. त्यामुळे या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघालाही विजयाची संधी होती, या वास्तवाकडे धोनीने लक्ष वेधलं आहे.

विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 135 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 35 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. भारतीय संघाचा अख्खा डाव आज 151 धावांत आटोपला.