मुंबई : बॉक्सिंगच्या इतिहासातला सर्वात लक्षवेधक आणि महागडा सामना आज फ्लॉईड मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेअर यांच्यात होत आहे. लासवेगासमधे होणाऱ्या या सामन्याचं जगभरातल्या 200 पेक्षा जास्त देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. एका अनधिकृत वृतानुसार या सामन्यात मेवेदरवर जवळपास 600 मिलीयन डॉलर्स म्हणजेच 3 हजार 800 कोटी रुपये लावण्यात आले आहेत.


लास वेगासच्या टी – मोबाईल अरिनात खेळला जाणारा हा सामना तब्बल 12 राउंडसमध्ये होणार आहे. जगभरातले किमान 1 अब्ज क्रिडाप्रेमी हा सामना पहातील असा असा अंदाज आहे. अशा प्रकारच्या सामन्यात एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा लावण्याची ही जगातली पहिलीच वेळ असावी, असं एमएमए अल्टीमेट फाइटिंग चैंपियनशिपचे मुख्य कार्यकारी डेना वाइट यांना वाटतंय. अरिनामध्ये मेवेदर आतापर्यंत अजिंक्य असल्यामुळे त्यालाच या लढतीचा फेवरीट मानलं जातंय. 40 वर्षाचा मेवेदर म्हणजे बॉक्सिंगजगताचा अढळ तारा मानला जातो. आतापर्यंत आयुष्यात 49 लढती खेळणाऱ्या मेवेदरने एकही लढत गमावलेली नाही हे विशेष. त्यामुळे 49-0 असं रेकॉर्ड अभिमानानं मिरवणाऱ्या मेवेदरचा प्रयत्न हे रेकॉर्ड 50 – 0 करण्याचा असेल यात शंकाच नाही. विशेष म्हणजे  रिंगक्राफ्टमधून मेवेदरनं 2015 मध्येच निवृत्ती जाहीर केलीय.

दुसरीकडे मेवेदरचा प्रतिस्पर्धी म्हणून रिंगमध्ये उतरणारा कोनॉर मॅकग्रेअरनं दोन वेळा वर्ल्ड चॅम्पीयनशिपचा किताब मिळवलाय. तरीही प्रोफेशनल बॉक्सिंगमधलं त्याचं करिअर फारसं चमकदार नाही. असं असलं तरी त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अगदी चार वर्षापूर्वीपर्यंत तो डोल म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या बेकारीभत्त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत होता. आजची लढत जिंकून तब्बल 100 मिलीयन डॉलर्स म्हणजेच साधारणतः साडेसहाशे कोटी रूपये कमावण्याची आयुष्यात क्वचित मिळणारी संधी त्याच्याकडे आहे.

या सामन्यासाठी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये तब्बल 20 हजार प्रेक्षक उपस्थित रहातील. दोन महिन्यापूर्वी या सामन्याची घोषणा झाल्याक्षणीच लढतीची सर्व तिकीटं विकली गेलीत. तिकीटाची किंमत जरी भारतीय चलनात 16 हजार रूपये असली, तरी काळ्याबाजारात फ्लोअर टिकीटची किंमत तीन कोटी रुपयांपर्यंत असल्याचंही सांगितलं जातं. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेसहाला सुरू होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातल्या क्रिडाप्रेमींचं लक्ष रहाणार आहे. कारण मेवेदर आपलं रेकॉर्ड 50-0 असं करणार का डॉन ब्रॅडमन ते उसेन बोल्ट यांच्या पंक्तीत बसणार याचं उत्तर मिळणार आहे.