राजकोट : देशासाठी निळी जर्सी घालण्याचं स्वप्न पाहण्यासोबतच एका नवीन क्रिकेटरचा जन्म होतो. काल राजकोटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात अशाच एका रिक्षा चालकाच्या मुलाचं हे स्वप्न पूर्ण झालं. गोलंदाज मोहम्मद सिराज असं त्याचं नाव आहे.
वयाच्या 23 व्या वर्षी सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या आक्रमणासमोर त्याला खास कामगिरी करता आली नाही आणि शेवटच्या षटकांमध्ये तो महागडा ठरला. मात्र एका खेळाडूसाठी टीम इंडियाच्या जर्सीची काय किंमत आहे, ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते सिराजला कॅप देण्यात आली आणि त्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी त्याचे आदर्श असणाऱ्या आणि टीम इंडियाच्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रगीतासाठी उभा राहिला असताना सिराजला अश्रू अनावर झाले.
देशासाठी खेळणं किती गर्वाची बाब आहे, हे सिराजच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होतं. देशाचं राष्ट्रगीत गाताना सिराजचे डोळे पाणावले आणि त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात करत मैदानावर पहिलं पाऊल ठेवलं.
मोहम्मद सिराजचे वडील रिक्षा चालक असून त्यांनी संघर्षातून त्याला इथपर्यंत पोहोचवलं आहे. 2015 साली सिराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर त्याला याच वर्षी सनरायझर्स हैदराबादने मोठ्या रकमेत खरेदी केलं. यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने 26 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 2016-17 या सत्रात तो 41 विकेटसह सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होता.