मुंबई : 2015 आणि 2019 अशा दोन वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलला टीम इंडियाला झटका बसल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास घडवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. शमीने तब्बल 7 विकेट घेत पुन्हा एकदा विरोधी संघासाठी कर्दनकाळ झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. भारताच्या या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या, पण त्यानंतर मिशेल आणि विल्यमसनने तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली होती. मात्र, मोहम्मद शमीने पुन्हा एकदा मदतीला धावत कर्णधार केन विल्यमसन आणि टाॅम लॅथमला बाद करत सामन्यात परत आणले.
मोहम्मद शमीने सामना पलटला
न्यूझीलंडने 32.1 षटकात 2 गडी गमावून 220 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर मोहम्मद शमीने केन विल्यमसनची विकेट घेत न्यूझीलंडची भागीदारी मोडून काढली आणि टीम इंडियाला विजयाकडे नेले. त्यानंतर ग्लेन फिलिप्ससह डॅरिल मिशेलने आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. डॅरिल मिशेलने 119 चेंडूत 134 धावांची खेळी केली. डॅरिल मिशेल आपल्या संघाला क्रॅम्प असतानाही विजयाकडे नेत होता, परंतु मोहम्मद शमीने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात शमीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आणि या विश्वचषकात सुद्धा सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या.
12 वर्षांनी 'फायनल' मार्ग दाखवताच मोहम्मद शमी काय म्हणाला?
विजयानंतर सामनावीर ठरलेला शमी म्हणाला की, मी माझ्या क्षणाची वाट पाहत होतो. मी पांढऱ्या चेंडूमध्ये जास्त क्रिकेट खेळत नव्हतो. माझ्या मनात होते, आपण यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल यांसारख्या बर्याच गोष्टींबद्दल बोलतो. मी नवीन चेंडूने विकेट घेण्याचा प्रयत्न केला. मी नवीन चेंडूने जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो. मी केन विल्यमसनचा झेल सोडला तेव्हा वाईट वाटले. मी वेग घेण्याचा प्रयत्न केला. ते त्यांचे फटके खेळत होते, म्हणून, मी एक संधी घेतली, विकेट चांगली होती. दवची भीती होती. गवत छान कापले होते. धावा पुरेशा होत्या. दव आले असते तर परिस्थिती बिघडली असती. हळूवार चेंडू कदाचित काम करत नसतील. मला आश्चर्यकारक वाटते. हे एक मोठे व्यासपीठ आहे. 2015 आणि 2019 च्या WC मध्ये आम्ही उपांत्य फेरीत हरलो. मला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ पाहत आहे. आपल्या सर्वांना अशी संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नाही.
याशिवाय मोहम्मद शमीने या सामन्यात विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. मोहम्मद शमीच्या धोकादायक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून भारताने केवळ अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले नाही तर 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. आता मोहम्मद शमी अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या