Mohammed Shami: मोहम्मद शमीने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 35 वर्षीय शमीने स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत त्याला स्वतःला खेळाचा कंटाळा येत नाही, तोपर्यंत तो क्रिकेट सोडणार नाही. शमीने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये यावर आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, "जेव्हा मी थकेन, तेव्हा मी माझा स्वतःचा निर्णय घेईन. पण सध्या, मी निवृत्तीचा विचारही करत नाही, कारण असे विचार तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करतात." विशेष म्हणजे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शमीला पुनरागमन संदर्भात कठिण असल्याचे सांगितले होते. यानंतर शमीने प्रतिक्रिया दिली आहे. 

निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे स्वतःचा असेल

त्याने पुढे असेही सांगितले की, निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे त्याचा स्वतःचा असेल, तो निवड, वय किंवा दुखापतीमुळे घेतला जाणार नाही.शमी म्हणाला, "जर तुम्ही निवृत्तीचा विचार करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही थकला आहात. आणि जर तुम्ही थकला असाल, तर तुम्हाला कंटाळा आला आहे. मी याआधीही सांगितले आहे की, ज्या दिवशी मला सकाळी उठल्यावर कंटाळा येईल, तोच दिवस असेल जेव्हा मी क्रिकेट सोडेन." शमी शेवटचा भारतासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. तेव्हापासून, बंगालसाठी 67 बळी घेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करूनही, तो जवळपास एक वर्ष टीम इंडियाच्या बाहेर आहे.

जे माझ्या हातात आहे, तेच मी नियंत्रित करू शकतो

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय संघाच्या निवड समितीने तेव्हापासून त्याला संघात स्थान दिलेले नाही. मात्र, याबाबतीत शमीची भूमिका स्पष्ट आहे. तो म्हणाला, "जे माझ्या हातात आहे, तेच मी नियंत्रित करू शकतो, माझी कामगिरी. बाकीचे माझे नशीब मी बदलू शकत नाही." दरम्यान, सनरायझर्स हैदराबादकडून बदली होऊन शमी आता आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. त्याने फ्रँचायझीच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे वचन दिले आहे. शमी म्हणाला, "एक गोलंदाज म्हणून मी माझे 100 टक्के देईन. मी संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. जर लखनौने माझ्यावर विश्वास दाखवला असेल, तर मी कठोर परिश्रम करेन. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे समाधान हे आहे की माझ्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळावे." 

इतर महत्वाच्या बातम्या