नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शमीची पत्नी हसीन जहां हिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. पण याप्रकरणी चौकशीनंतर शमीला क्लीन चिट मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.


पाकिस्तानी तरुणी अलिश्बा हिच्याकडून शमीने दुबईत पैसे घेतल्याचा आरोप शमीच्या पत्नीने केला होता. तसंच तिने मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमने या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. ज्यात शमीची पत्नी हसीन जहां हिचीही चौकशी करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल बीसीसीआयच्या प्रशासर समितीचे प्रमुख विनोद राय यांना सोपवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये शमीला क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. बीसीसीआय या संपूर्ण प्रकरणी आपला निर्णय जाहीर करु शकतं.

याआधी बीसीसीआयने कोलकाता पोलिसांनाही आपला अहवाल दिला आहे. रिपोर्टनुसार, 17 आणि 18 फेब्रुवारीला शमी दुबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. पण तो कोणासोबत होता याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. हसीन जहांच्या आरोपानंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आपल्या पातळीवर केली.

बीसीसीआयकडून जर मोहम्मद शमीला क्लीन चिट मिळाली तर त्याला पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीत सामील केलं जाईल.

6 मार्चला मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते. तसंच तिने कोलकातामध्ये शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारही नोंदवली होती.

संबंधित बातम्या
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा 

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी 

मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी

कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?

दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां

फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा