मुंबईः मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं अँटिगा कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. सर व्हिव रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 अशी अवस्था झाली आहे.


 

 

इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी विंडीजच्या फलंदाजांना आपल्या भेदक माऱ्याने जेरीस आणलं. त्यामुळे विंडीज संघाला निदान एका डावाने तरी पराभव टाळण्याचं मोठं आव्हान उभं राहीलं आहे.

 

शमीचं दमदार पुनरागमन

 

मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राजेंद्र चंद्रिका, डॅरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स आणि जर्मेन ब्लॅकवूड या टॉप ऑर्डर फलंदाजांना शमीच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरणं काही जमलंच नाही. अँटिगा कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीनं 20 षटकांत 66 धावांच्या मोबदल्यात विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

 

 

अँटिगाच्या संथ खेळपट्टीवर शमीनं अचूक टप्प्यावर चेंडू टाकून फलंदाजांना बुचकळ्यात टाकलं. एकीकडे ईशांत शर्मा आणि उमेश यादव विकेट मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी मोहम्मद शमीनं आपलं वेगळेपण सिद्ध करुन दाखवलं. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर मोहम्मद शमीनं भारतीय संघात पुनरागमन केलं. पण आजही त्याच्या गोलंदाजीची धार मात्र कायम आहे.

 

 

शमी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. पण त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळं शमीला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासह आयपीएललाही मुकावं लागलं होतं.

 

शमीचा नवा विक्रम

 

अँटिगा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद शमीनं मार्लन सॅम्युअल्सला बाद करुन कसोटी कारकीर्दीत 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. शमीनं आपल्या कारकीर्दीतल्या 13व्या कसोटी सामन्यात 50 कसोटी विकेट्सचा पल्ला गाठला आणि वेंकटेश प्रसादच्या विक्रमाची बरोबरी साधली. कसोटीत सर्वांत जलद 50 विकेट्सचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये आता शमी आणि प्रसाद आघाडीवर आहेत.

 

उमेश यादवचाही भेदक मारा

 

मोहम्मद शमीनं तिसऱ्या दिवशी सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून वेस्ट इंडिजचा संघ काही सावरलाच नाही. शमीच्या दणक्यानंतर विंडीजच्या शेपटाला जास्त वळवळ करण्याची संधी उमेश यादवनेही दिली नाही. उमेश यादवनं 18 षटकांत 41 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या.

 

 

भारतीय वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 243 धावांवरच आटोपला. त्यामुळं विंडीजवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. मग दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय आक्रमणासमोर निष्प्रभ ठरताना दिसले. ईशांत शर्मानं क्रेग बॅथवेटला माघारी धाडल्यानं विंडीजची तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 अशी अवस्था झाली. आता डावानं पराभव टाळायचा असेल तर विंडीजला अजूनही 302 धावांची गरज आहे.