मुंबई : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने बंगळुरुवर पाच विकेट्स राखून मात केली. यासोबतच मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
मुंबईचा हा यंदाच्या आयपीएलमधला आठवा विजय ठरला. 16 गुणांसह मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर 14 गुण असलेल्या कोलकात्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.
रोहित शर्माने मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद 56 धावांची खेळी केली. नितीश राणा 27, जॉस बटलर 33 यांनीही मुंबईच्या विजयासाठी महत्वाचं योगदान दिलं.
बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळुरुच्या गोलंदाजांना मुंबईच्या फलंदाजांना रोखता आलं नाही. बंगळुरुकडून पवन नेगीने 2, तर शेन वॅट्सन, यजुवेंद्र चहल आणि अंकित चौधरी यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.