बर्लिन : 2014 च्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा प्रमुख शिलेदार आणि आधारस्तंभ मेसूत ओझिलनं जर्मन फुटबॉल संघाला गुड बाय केलं आहे. ओझिलच्या या निर्णयामुळे फुटबॉलविश्वात सध्या खळबळ माजली आहे. जर्मनीच्या चाहत्यांकडून होत असलेल्या सततच्या वंशभेदी टीकेमुळे 29 वर्षीय ओझिलनं ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा केली.

मे महिन्यात झालेल्या इंग्लिश प्रिमीयर लीगदरम्यान तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप इर्डोगन यांनी आर्सेनलचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ओझिलची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी ओझिलचा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतचा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. मुळात ओझिल आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष इर्डोगन दोघंही टर्कीश-जर्मन वंशाचे असल्यानं जर्मन चाहते आणि माध्यमांना ओझिलची ही कृती पचली नाही. त्यामुळे ओझिलला माध्यमं आणि नेटिझन्सकडून वांशिक शेरेबाजीला सामोरं जावं लागलं.

ओझिलनं मात्र यावर मौन बाळगताना इंग्लिश प्रिमीयर लीगनंतर विश्वचषकावर आपलं लक्ष्य केंद्रित केलं. पण विश्वचषकात जर्मनीला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर जर्मन चाहत्यांनी ओझिलवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. आपल्यावर होणाऱ्या सततच्या टीकेमुळे अखेर ओझिलनं मौन सोडत यापुढे जर्मनीसाठी खेळणार नसल्याचं जाहीर केलं.

आक्रमक मिडफिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझिलनं गेल्या नऊ वर्षात जर्मनीसाठी भरीव योगदान दिलं होतं. जर्मनीकडून आजवर 92 सामन्यात खेळताना त्यानं 23 गोल नोंदवले होते तर 40 गोल्ससाठी सहाय्य केलं होतं. 2014 साली चौथ्यांदा विश्वविजेता ठरलेल्या जर्मन संघाचा ओझिल हा महत्वाचा शिलेदार होता. याशिवाय जर्मनीच्या सर्वोत्तम फुटबॉलवीरासाठी देण्यात येणारा प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार ओझिलं पाच वेळा पटकावला होता. त्यामुळे ओझिलच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे जर्मनीसह अवघे फुटबॉलविश्व हादरले आहे.