मुंबई : गुजरातमधील बडोद्याच्या महाराजा सयाजी विद्यापीठात होणारा कुणाल कामरा या स्टॅण्ड-अप कॉमेडियनचा शो रद्द करण्यात आला आहे. देशद्रोही कंटेंटचा आरोप करत कुणालचा हा शो रद्द केल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

महाराजा सयाजी विद्यापीठात 11 ऑगस्टला कुणालचा स्टॅण्ड-अप कॉमेडी शो होणार होता. पण विद्यापीठाच्या 11 विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना पत्र लिहित कुणाल कामरा आपल्या कॉमेडीत देशद्रोही मजकूर वापरत असल्याने त्याचा शो रद्द करावा, अशी मागणी केली.

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर कुणालचा कॉमेडी शो रद्द करण्यात आला. शो रद्द केल्याची माहिती मला विद्यापीठाने नाही दिली, तर ही माहिती मला माध्यमांतूनच समजली, असं कुणाल कामराने म्हटलं आहे.

‘जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही एखाद्या विशिष्ट दिवशी काम करणार नाही आहात. मी माझ्या त्या दिवसाच्या सुट्टीचा आनंद आजच्या सुट्टीच्या दिवशी सेलिब्रेट करत आहे,’ असं ट्विटरवर लिहित कुणाल कामराने विद्यापीठाच्या निर्णयावर उपरोधिक भाष्य केलं आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामावर आपल्या तिरकस शैलीतून टीका करण्यासाठी कुणाल कामरा हा कॉमेडियन ओळखला जातो.