INDvsZIM: नाणेफेक जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2016 01:31 AM (IST)
हरारे (झिम्बाब्वे) : हरारेच्या दुसऱ्या वन डे मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वन डे मध्ये 9 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर धोनी ब्रिगेड दुसऱ्या वन डे साठी सज्ज झाली आहे. भारत आणि झिम्बाब्वे संघांमधल्या वन डे मालिकेची दुसरी लढाई आज हरारेमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता या सामन्याची सुरूवात होईल. याआधी शनिवारी झालेल्या सलामीच्या लढतीत टीम इंडियानं 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता आणि तीन सामन्यांच्या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरी वन डे जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी धोनीचे युवा शिलेदार सज्ज झाले आहेत. शनिवारच्या लढतीत लोकेश राहुलची शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी पहिल्या वन डेत राहुलसोबतच भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी बजावली होती. जसप्रीत बुमरानं चार तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरननं प्रत्येकी दोन विकेट्स काढून झिम्बाब्वेचा डाव 168 धावांत गुंडाळला होता. आता दुसऱ्या वन डेत हे युवा शिलेदार काय कामगिरी बजावतात यावर सर्वांची नजर राहील. के एल राहुलच्या खेळीकडे सर्वांचंच लक्ष भारताचा सलामीवीर लोकेश राहुलनं शनिवारी हरारेमधल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच शतक ठोकणारा तो पहिला भारतीयही ठरला. राहुलनं 115 चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 100 धावा फटकावल्या होत्या तसंच अंबाती रायुडूसह 162 धावांची अभेद्य भागीदारीही रचली होती. संबंधित बातम्याः