थिरुवनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला पाचवा आणि अखेरचा वन डे सामना आज थिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने चौथी वन डे जिंकून, पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचव्या वन डेसह मालिकाही जिंकून वर्षाचा शेवट सुखद करण्याचा विराटसेनेचा प्रयत्न राहिल.
टीम इंडियाने 2015 सालापासून मायदेशात वन डे सामन्यांची एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे विंडीजने विशाखापट्टणममध्ये टाय केलेली दुसरी वन डे आणि त्यानंतर पुण्याच्या तिसऱ्या वन डेत मिळवलेला विजय ही कामगिरी टीम इंडियाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी होती.
पण मुंबईतील चौथ्या वन डे सामन्यात विंडीजने सपशेल लोटांगण घातलं. 224 धावांच्या विराट विजयानंतर भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहे आणि भारतीय संघाला आता मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात सलग आठवी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
थिरुवनंतपुरमच्या ग्रीन फील्ड मैदानावर पहिल्यांदाच वनडे सामना आणि दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. याआधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकमेव ट्वेण्टी 20 सामना खेळवण्यात आला होता.