मुंबई : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या आयुष्यात आलेल्या वादळांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानी युवतीकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शमीची पत्नी हसीन जहाँने करुन, अप्रत्यक्षपणे मॅच फिक्सिंग केल्याची शंका व्यक्त केली आहे.

कोलकात्यातील लाल बाजार पोलीस ठाण्यात मोहम्मद शमीविरोधात हसीन जहाँने तक्रार दाखल केली आहे.

“शमीने पाकिस्तानातील एका तरुणीकडून पैसे घेतले, जे इंग्लंडहून पाठवण्यात आले होते. ते पैसे का पाठवण्यात आले होते? बीसीसीआयने बुक केलेल्या हॉटेलमध्ये एखादी अनोळखी तरुणी कशी पोहोचते?”, असे गंभीर प्रश्न हसीनने उपस्थित केले आहेत.

“पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीला शमी बोलवतो. तिच्यासाठी खास रुम बुक करतो. तिच्यासोबत त्याचे संबंध आहेत. तिच्यामार्फत इंग्लंडमधील कुणीतरी मोहम्मद भाईने पैसे पाठवल्याचे तो सांगतो. मात्र ते पैसे कसले आहेत, का दिले, याची माहिती त्याने मला अद्याप कधीच सांगितले नाही.”, असेही हसनीने एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

“अल्ला करो नि असे होऊ नये, पण तो काहीतरी फ्रॉड करु शकतो, तो देशासोबतही गद्दारी करु शकतो. माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हीही दुबईत त्या हॉटेलमध्ये जाऊन पाहू शकता की, त्याने सिंगल अॅडल्टच्या नावे बुकिंग केली होती की नाही. कोणत्या गोष्टीचे शमीने पैसे घेतले? शमीसोबत मी बोलले, त्यावेळेचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ज्यात त्याने पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.”, असे हसीने सांगितले.