मुंबई: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल अचानक वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. पण धोनीचा कोणाताही निर्णय हा झटपट घेतलेला नसतो. त्यामागे असतं प्रचंड प्लॅनिंग आणि हे आजवर आपल्याला अनेकदा दिसूनही आलं आहे.


2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात धोनीची खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळेच धोनीनं हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या भलताचफॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्या साथीनं खेळत राहणं हेच धोनीसाठी योग्य आहे. म्हणूनच धोनीनं योग्य वेळी हा निर्णय घेतला.

धोनीनं बोर्डाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी वनडे आणि टी-20 संघाचं कर्णधारपद सोडत आहे. पण विराट कोहलीसाठी मी मेन्टॉर म्हणून काम करण्यासाठी तयार आहे.

जगातील सर्वात उत्कृष्ट फिनिशर अशी धोनीची इमेज गेल्या काही वर्षात तयार झाली होती. पण मागील काही सामन्यापासून धोनीची जादू काहीशी कमी झाल्याचं वारंवार दिसून आलं आहे. यूएसएमध्ये खेळविण्यात आलेल्या टी-20 सामन्यात ड्वेन ब्राव्होनं धोनीला विजयापासून रोखलं होतं. मागील काही सामन्यांमध्येही धोनीची कामगिरी यथातथाच राहिली होती.

दुसरीकडे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मागील सोळा महिन्यात भारतीय कसोटी संघानं श्रीलंका (2-1), द. आफ्रिका (3-0), वेस्ट इंडिज (2-0), न्यूझीलंड (3-0) आणि इंग्लंड (4-0) मालिका जिंकल्या होत्या. यावेळी विराटनं तब्बल 1600 हून अधिका धावा केल्या आहेत. तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना वनडे सामन्यातही त्याने धडाकेबाज कामगिरी केलं आहे. तर 15 वनडे सामन्यात 75च्या सरासरीनं तब्बल 948 धावा केल्या आहेत

मागील काही दिवसांपासून अनेक क्रिकेट चाहत्यांकडून विराटला वनडे आणि टी-20चं कर्णधारपद द्यावं ही मागणी होत होती. त्यामुळे वारे कोणत्या दिशेनं वाहू लागले आहेत हे धोनीनं अचूक ओळखलं आणि वेळीच योग्य तो निर्णय घेऊन तो मोकळाही झाला.
राजीनामा दिल्यानंतर धोनीची बीसीसीआय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याशी प्रदीर्घ बातचीत झाली. असंही समजतं आहे की, 2019च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे. एकाच कर्णधाराकडे तीनही फॉर्मेटचं कर्णधारपद असावं असं धोनीला वाटतं. त्यामुळे धोनीनं राजीनामा देऊन विराटकडे जबाबदारी सोपावली आहे.

संबंधित बातम्या:

धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं