मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डो... व्यावसायिक फुटबॉलविश्वाचा सर्वात मोठा शोमन पोर्तुगालच्या या फुटबॉलवीराकडे खरं तर फिफाचा विश्वचषक नाही, पण नैसर्गिक देखणेपण आणि अंगभूत फुटबॉलकौशल्याने रोनाल्डोला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.2016 सालच्या युरो कपसह तब्बल 26 विजेतीपदं, फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलवीर म्हणून पाच किताब, तसंच देशासाठी आणि विविध क्लब्ससाठी मारलेले साडेसहाशेहून अधिक गोल्स या कामगिरीने रोनाल्डोला एक ग्लोबल ब्रँड बनवलं आहे. सीआर सेव्हन ही आहे त्या ब्रँडची ओळख.

रोनाल्डो आणि त्याच्या सीआर सेव्हन या ब्रँडचा महिमा इतका मोठा आहे की, त्या दोन नावांवर जगभरात करोडो डॉलर्सची उलाढाल होते... सोशल मीडियावर 32-33 कोटींहून अधिक फॉलोअर्स निर्माण होतात. रोनाल्डोला करारबद्ध करण्यासाठी स्पॉन्सर्सची रांग लागते. अंडरवेअरपासून अगदी आलिशान हॉटेल्सच्या मार्केटिंगसाठी रोनाल्डोचा चेहरा वापरण्यात येतो. साहजिकच रोनाल्डोच्या पायाशी जगभरातलं सारं वैभव आज लोळण घेत आहे. पोर्तुगालमधल्या मदेरा शहरात त्याचं म्युझियम आहे. मदेरात त्याच्या नावाने विमानतळही उभा राहिलं आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या फुटबॉलमधल्या पुण्याईने उभा राहिलेला हा सीआर सेव्हन नावाचा ब्रँड एका गंभीर आरोपाने कोसळण्याची वेळ आली आहे. रोनाल्डोवरचा हा आरोप आहे बलात्काराचा.

अमेरिकन मॉडेल कॅथरिन मायोरगाने रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप करून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 2009 साली लास वेगासमधल्या पाम्स हॉटेल अँड कॅसिनोमध्ये हा प्रकार घडल्याचा तिचा आरोप आहे.

कॅथरिन मायोरगा म्हणते... “रोनाल्डोशी झालेल्या ओळखीनंतर त्याने मला आणि आणखी काहीजणांना त्याच्या रुममध्ये बोलावलं होतं. मी बाथरुमला गेलेले असताना तो अचानक तिथे आला. त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर रोनाल्डोने मला ओढत ओढत बेडरुमध्ये नेलं आणि माझ्यावर बलात्कार केला.”

कॅथरिन मायोरगाने तिच्यावर ओढवलेल्या गंभीर प्रकाराची लास वेगास पोलिसांत तक्रार केली होती. त्या तक्रारीत कॅथरिनने आधी रोनाल्डोचं नाव टाकलं नव्हतं. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा तोंड न उघडण्यासाठी, तिला तीन-चार लाख डॉलर्सची ऑफर देण्यात आली. कॅथरिन त्याला बधली नाही. तिने बलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आणि सारी चक्रं फिरली.

कॅथरिन मायोरगावरच्या बलात्कार प्रकरणातला आरोपी हा ख्रिस्तियानो रोनाल्डो असल्याचं खळबळजनक वृत्त गेल्या वर्षी पहिल्यांदा प्रसिद्ध झालं होतं. रोनाल्डोने त्या आरोपाचा इन्कार केला असला तरी, त्याच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

रोनाल्डोचा चेहरा आणि त्याचा सीआर सेव्हन हा ब्रँड वापरत असलेल्या उद्योगसमूहांचे सध्या धाबे दणाणले आहेत. रोनाल्डोचा नवा क्लब युवेन्टसच्या शेअर्सची मिलान स्टॉक एक्सेंजवरची किंमत दहा टक्क्यांनी कोसळली आहे. याच युवेन्टसने रोनाल्डोला तब्बल साडेअकरा कोटी डॉलर्स मोजून रिआल माद्रिदकडून विकत घेतलं होतं. युवेन्टससारखीच गत नाईकीचीही झाली आहे. नाईकी या अमेरिकन स्पोर्टसवेअर कंपनीचं बाजारमूल्य आज हजारो कोटी डॉलर्सच्या घरात आहे. त्यात नाईकीसाठी रोनाल्डोचं सोशल मीडियावरचं मूल्य 60-70 कोटी डॉलर्सच्या घरात आहे. हा सारा बाजार कधीही कोसळू शकतो, कारण रोनाल्डोवरचा बलात्काराचा आरोप.

रोनाल्डोला करोडो डॉलर्सची त्याची कमाई आणि त्याच्या लोकप्रियतेचा प्रचंड गर्व होता. माझं वैभव, माझं देखणेपण आणि माझ्या फुटबॉलकौशल्याचा लोकांना हेवा वाटतो, अशी दर्पोक्ती त्याने एकदा केली होती. रोनाल्डोचा हा सारा माज आता कधीही उतरू शकतो.