नवी दिल्लीः एकेकाळी जाहिरात विश्वात सर्वात अव्वल असणारा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा दबदबा कमी होताना दिसत आहे. धोनीला मागे टाकत कसोटी कर्णधार विराट कोहली नवा स्टार बनलाय. धोनीचा पेप्सिकोसोबतचा करार नुकताच संपला. मात्र कंपनीने धोनीऐवजी नवा करार विराट कोहलीसोबत केला आहे.
धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केवळ वन डे आणि टी- 20 वर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र जाहिरात विश्वातील धोनीचा दबदबा कमी झाल्याचं चित्र आहे. 2014 नंतर धोनीच्या बाजार मूल्यात कमालीची घसरण झाली आहे.
विराट धोनीच्याही पुढे
धोनीकडे सध्या केवळ 10 कंपन्यांच्या जाहिरातींची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी धोनीकडे 18 कंपन्यांच्या जाहिरातीची जबाबदारी होती. विराट कोहलीकडे सध्या 14 कंपन्यांच्या जाहिरातींची जबाबदारी आहे. तसेच बाजारात विराटचीच जास्त मागणी आहे. फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 कंपन्यांचा अम्बेसेडर होता. ज्यातून सचिनने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली असल्याचं बोललं जातं.
धोनी 2014 मध्ये 18 कंपन्यांची जाहिरात करत होता. यातून धोनीने 27 मिलीयन डॉलरची कमाई केली. मात्र 2016 मध्ये धोनीसोबत केवळ 10 कंपन्यांचा करार बाकी आहे. धोनीची जाहिरातीमधील एका दिवसाची कमाई दीड कोटी रुपये आहे, तर विराट आणि सचिनची एका दिवसाची कमाई 2 कोटी रुपये आहे, असं वृत्त इकोनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राने दिलं आहे.