लुसान (स्वित्झर्लंड) : रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाला उत्तेजक सेवनप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून दिलासा मिळाला आहे. क्रीडा लवादानं शारापोव्हावरील बंदीचा कालावधी घटवून दोन वर्षांऐवजी पंधरा महिन्यांचा केला आहे.

क्रीडा लवादाच्या निर्णयामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये शारापोव्हाला आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करता येणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान झालेल्या उत्तेजक तपासणीत शारापोव्हाच्या नमुन्यात मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचा अंश आढळून आला होता.

वाडानं बंदी घातलेल्या औषधांची सुधारित यादी असलेला इमेल आपल्याकडून नजरचुकीनं वाचायचा राहून गेला, असा बचाव शारापोव्हानं केला होता. मात्र वाडानं तिच्यावर 2 वर्षांसाठी बंदी घातली.

वाडाच्या निर्णयाविरोधात शारापोव्हाच्या अपिलानंतर क्रीडा लवादानं तिची शिक्षा नऊ महिन्यांनी कमी केली. त्यामुळे शारापोव्हाच्या चाहत्यांना लवकरच तिला खेळताना पाहायला मिळणार आहे.