मुंबई : टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण तडकाफडकी निवृत्तही होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे.


पुढचे दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेऊन आपण हा काळ प्रादेशिक सेनेच्या सेवेत व्यतित करणार असल्याचं धोनीनं बीसीसीआयला कळवलं आहे. धोनी हा भारतीय सेनेच्या पॅरा रेजिमेंटमध्ये ऑनररी लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावर आहे.


विश्वचषकानंतर प्रादेशिक सेनेसाठी दोन महिने देण्याचा शब्द त्यानं आधीच दिला होता. त्यासाठी विंडीज दौऱ्यातून न जाण्याचा निर्णय धोनीनं घेतला आहे. त्याच्या या निर्णयाची निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कल्पना देण्यात आली आहे.


"महेंद्रसिंह धोनीने स्वत: वेस्ट इंडीज दौऱ्यांतून माघार घेतली आहे. कारण धोनी पुढील दोन महिने प्रादेशिक सेनेसोबत घालवणार आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघात समावेश नसणार आहे. धोनीने रविवार निवड समितीच्या बैठकीच्या आधी आपला निर्णय कळवला", असं बीसीसीआयने म्हटलं आहे.


विश्वचषकातील संथ फलंदाजीमुळे धोनीवर अनेकांनी टीका केली. त्याच्या संघातील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह उभं केलं. धोनीने आता निवृत्ती घ्यावा अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली होती. मात्र धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा झाली नसल्याचं टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने स्पष्ट केलं.



संबंधित बातम्या