भारत वि. न्यूझीलंड अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने टॉस जिंकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राच्या 14 व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता महेंद्रसिंग धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा चाहता धावत येत धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली बसला. पण धोनीने हातातला तिरंगा पायाजवळ जाण्यापूर्वीच काढून घेतला.
मैदानातील धोनीच्या या देशप्रेमाबद्दल सगळीकडूनचं कौतुकांचा वर्षाव होत आहे. यातून देशप्रेम हे नेहमीच आपल्यापुढे असल्याचं पुन्हा एकदा धोनीनं दाखवून दिलं आहे.
दरम्यान रोहित शर्माच्या टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यातल्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात चार धावांनी निसटती हार स्वीकारावी लागली. न्यूझीलंडनं हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
सामन्यात न्यूझीलंडनं भारतीय संघासमोर विजयासाठी 213 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सोळाव्या षटकात सहा बाद 145 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्यानं सातव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी रचली. कार्तिकनं 16 चेंडूंत नाबाद 33, तर कृणालनं 13 चेंडूंत नाबाद 26 धावांची खेळी केली. पण त्यानंतरही टीम इंडियाला चार धावांनी विजयानं हुलकावणी दिली.