कोलकाता : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन तीन वर्ष लोटली आहेत. पण तोच धोनी पांढरी जर्सी परिधान करुन कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर उतरला होता. त्यानं चक्क खेळपट्टीची पाहणी केली आणि क्युरेटरशी त्यासंदर्भात चर्चाही केली. मग धोनीनं बराच वेळ नेट्समध्ये फलंदाजीही केली. पण धोनीनं हे सगळं केलं ते एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी.


या शूटिंगसाठी धोनीसोबत माजी कर्णधार कपिल देवही उपस्थित होते. धोनीनं यावेळी तिथं उपस्थित लहान मुलांशी संवादही साधला आणि त्यांना खेळासंदर्भात टीप्सही दिल्या.

दरम्यान, याच मैदानावर 16 नोव्हेंबरपासून भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे.

90 कसोटीत महेंद्रसिंह धोनीच्या नावावर 4876 धावा जमा आहेत. तसंच 6 शतकं आणि 33 अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत.