पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही उत्सुकतेचा आणि महत्त्वाचा ठरला. डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागात तिसरी फेरी गाठली. तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅट विभागत लातूरच्या सागर बिराजदारनं विजयाचा धडाका सुरू ठेवला.

विजय चौधरी माती विभागातील तिसऱ्या फेरीत

डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागात तिसरी फेरी गाठली आहे. पुण्याच्या वारजे इथं सुरू असलेल्या स्पर्धेत विजय चौधरीनं सोलापूरच्या संतोष दोरवडवर गुणांच्या आधारे मात केली. त्याआधी पहिल्या फेरीत विजयनं कोल्हापूर शहरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिन जामदारवर 3-0 अशी गुणांच्या आधारे मात केली होती. विजय चौधरी जळगावच्या चाळीसगावचा रहिवासी असून गेली दोन वर्ष त्यानंच महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता.

लातूरच्या सागर बिराजदारचा विजयाचा धडाका सुरुच

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅट विभागत लातूरच्या सागर बिराजदारनं विजयाचा धडाका सुरू ठेवलाय. सागरनं तिसऱ्या फेरीत बीडच्या अक्षय शिंदेवर गुणांच्या आधारे मात केली. त्याआधी दुसऱ्या फेरीच्या सनसनाटी कुस्तीत सागरनं पुण्याच्या सचिन येलभरला चीतपट केलं होतं. त्याआधी पहिल्या फेरीत सागरनं पुणे शहरच्या महेश मोहोळवर 8-3 असा धक्कादायक विजय मिळवला होता. गेल्या वर्षी महेशनं महाराष्ट्र केसरीची उपांत्य फेरी गाठली होती, पण यंदा सागरनं पहिल्या फेरीत महेशला धूळ चारली.

गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी आणि मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान विक्रांत जाधवनं यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. विक्रांतनं दुसऱ्या फेरीत जालन्याच्या प्रतीक भक्तवर मात केली. विक्रातनं अवघ्या 39 सेकंदांत प्रतीकला चीतपट केलं. दुसरीकडे पुणे शहरचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अभिजीत कटकेनं भारंदाज डावावर अवघ्या वीस सेकंदांत रायगडच्या कुलदीप पाटीलला चीतपट केलं.

दरम्यान मॅट विभागाच्या तिसऱ्या फेरीत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेनं नांदेडच्या विक्रम वडतिलेवर मात केली. तर पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं सांगलीच्याअण्णा कोळेकरला हरवलं.