मुंबई : शरद पवारांच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत आर्थिक सुबत्ता नांदत असली, तरी त्याचा किती लाभ महाराष्ट्राच्या पैलवानांना होतो, हा प्रश्न आता पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेहून परतताना महाराष्ट्राच्या पैलवानांना अनारक्षित डब्यातून प्रवास करावा लागला आहे.

अयोध्येमधील राष्ट्रीय कुस्तीत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या संघात दहा महिला आणि वीस पुरुष पैलवानांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्यापैकी पाच पैलवानांनी पदकांची कमाईही केली. पण महाराष्ट्राच्या संघातील एखाददुसऱ्या सुदैवी पैलवानांचा अपवाद वगळता, अन्य पैलवानांवर अनारक्षित डब्यातून परतण्याची वेळ आली आहे.


अनारक्षित डब्यातही बसायला जागा नसल्यानं महाराष्ट्राच्या पैलवानांना बराच काळ टॉयलेटजवळ बसूनही प्रवास करावा लागला. या पैलवानांनी साऱ्या प्रवासाची छायाचित्रं सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.


महाराष्ट्राच्या पैलवानांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारा हा प्रवास तब्बल 25 तासांचा होता. ही पैलवान मंडळी रविवारी दुपारी साडेतीन वाजता फैजाबादहून साकेत एक्स्प्रेसनं मुंबईच्या दिशेनं निघाली होती. ही ट्रेन आज 4.45 वाजण्याच्या सुमारास मनमाडमध्ये दाखल झाली.


त्यामुळे राष्ट्रीय कुस्तीत पदक मिळवण्यासाठी घाम गाळल्यानंतर, पंचवीस तासांच्या ट्रेन प्रवासात महाराष्ट्राच्या पैलवानांच्या सहनशीलतेची कसोटी लागली. अयोध्येतील पदकविजेत्या, तसेच आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या पैलवानांचाही त्यात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अयोध्येला गेलेली पदाधिकारी मंडळी मात्र विमानानं माघारी परतली आहेत.