पुणे : सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातल्या वारजे गावात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पुणेकरांना आजपासून दहा डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 46 जिल्हा आणि शहर तालीम संघांमधून सातशेहून अधिक पैलवान आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
यंदाच्या महाराष्ट्र केसरीत सर्वांची नजर असणार आहे ती चाळीसगावच्या डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या विजय चौधरीकडे. विजय चौधरीने 2014 आणि 2015 अशी सलग दोन वर्ष महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यामुळे यंदा विजय चौधरी महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक साजरी करणार का याकडे कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
विजयी पैलवानांना बुलेट बक्षीस
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतल्या विजयी पैलवानांना यंदा खास बक्षीस मिळणार आहे. कारण पुण्यातल्या काही अवलियांनी एकत्र येऊन महाराष्ट्र केसरीतल्या विजयी पैलवानांना चक्क बुलेट बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसोबतच अनेक वजनी गटांच्या विजयी पैलवानांना बुलेट बक्षीस देण्यात येणार आहे.
तीन वर्षांनंतर पुण्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 2013 सालीही आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी विजेत्याला नवी कोरी स्कॉर्पियो भेट दिली होती. तर उपमहाराष्ट्र केसरी पैलवानाला बुलेट भेट दिली होती.