Maharashtra Kesari Shivraj Rakshe :  'महाराष्ट्र केसरी' खिताब विजेता मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याचं सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी'  जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे, अशा शब्दात त्याचं कौतुक केलं जात आहे.  


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची गौरवशाली कुस्तीपरंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. राज्यातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी राज्य सरकारने पार पाडावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.