Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड (Mahendra Gaikwad) आणि शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) यांच्यात होणार आहे. मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि सोलापूरचाच महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड याने 6-4 अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होईल. 


पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. काही वेळातच आता अंतिम लढत देखील होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या अंतिम लढतीकडं लक्ष लागून राहिलं आहे.  


गादी विभागातील अंतिम लढतीत शिवराजने पहिल्यापासून आघाडी घेत शेवटपर्यंत कायम ठेवली. पहिल्या फेरीत हर्षवर्धन सदगीर याला एकही गुण मिळवता आला नाही. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धन याने केवळ एक गुण मिळवला. त्यामुळे शिवराज याने ही लढत 8-1 अशा फरकाने जिंकली आणि अंतिम लढतीत धडक मारली. 


माती विभागातून महेंद्र गायकवाड याने पहिल्यापासूनच सिकंदरवर आघाडी कायम ठेवली होती. अंतिम लढतीत सिकंदर याला चार तर महेंद्रला सहा गुण मिळाले. त्यामुळे 6-4 अशा फरकाने महेंद्र याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत धडक मारली. 


शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद  काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. आज अंतिम लढत ही एकाच तालमीतील मल्लांमध्ये होणार आहे.  


Shivraj Rakshe : दुखापतीतून सावरत शिवराजची अंतिम लढतीत धडक


महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी माती आणि त्यानंतर गादी विभागातील अंतीम लढत झाली. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. गादी विभागातून शिवराज राक्षे याने तर माती विभागातून महेंद्र गाडकवाड यांनी अंतिम फेरीत धडक मारली. दुखापतीतून सावरत शिवराजने 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा पराभव केला. यावेळी महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच या इराद्याने आपण आखाड्यात उतरत असल्याचं शिवराजने म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र केसरीसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळं आता यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा मी निश्चय केला असल्याची माहिती नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे याने दिली.