मुंबई : 'महाराष्ट्र केसरी' किताबविजेत्या पैलवानाला देण्यात येणारी चांदीची गदा परंपरेनुसार मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करण्यात आली. पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचं 1982 साली निधन झालं. त्यानंतर गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र केसरी किताबविजेत्या पैलवानासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते. मामासाहेबांचं जन्मगाव मुठा येथून ही चांदीची गदा पुण्यात आणल्यावर ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्द करण्यात येते. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी खासदार अशोकराव मोहोळ, चंद्रकांत मोहोळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या गदेचं पूजन करण्यात आलं. कशी असते 'महाराष्ट्र केसरी'ची गदा? उंची - 27 ते 30 इंच. व्यास - 9 ते 10 इंच. वजन - 10 ते 12 किलो अंतर्गत धातू - सागवानी लाकडावर कोरीव काम आणि आकर्षक पिळे बाह्य धातू - 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा. त्यावर कोरीव काम आणि झळाळी.
गदेचं बाह्यरुप - मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते. त्याच्या पलिकडच्या बाजूला हनुमानाचं चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेलं असतं. 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते? पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.