Khelo India Youth Games: खेलो इंडिया युथ गेम्सचय्या पदकतालिकेत अव्वल येण्यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात कालपासून झुंज पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रानं कालपासून हरियाणावर पदकतालिकेत आघाडी घेतलीय. मात्र, ही आघाडी फक्त एकाच सुवर्ण पदकाची आहे. त्यामुळं स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच उद्या (13 जून) हातघाईची लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे खो-खोचे दोन्ही संघानं फायनलमध्ये धडक दिल्यानं ती सुवर्णपदके हक्काची समजली जात आहेत. टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्रानं दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. ज्यामुळं हरियाणासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर, हरियाणाचे शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या बॉक्सिंगमध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.

आज चार सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदके मिळाली.आर्चरीमध्ये एक सुवर्णपदक आलं. त्यांनी रौप्य पदकही मिळवून दिलं. टेबल टेनिसमध्ये दीया चितळे पुन्हा सुवर्ण घेऊन आली. जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळं सुवर्णसंख्या वाढली. तिनं आज दोनदा सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये मात्र तब्बल पाच कांस्य पदके आली. सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राची पदकसंख्या शंभरीपार नेली. आज सकाळी आर्चरीमध्ये कम्पाउंडमध्ये सातारच्या आदिती स्वामीने सुवर्णपदक मिळवून दिले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्य पदक मिळाले.

महाराष्ट्राची नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता
जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आजही पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला. आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर 200 मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्ण पदक उंचावले. त्यात 2.18.39 सेकंदाची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. 4 बाय 100 फ्रीस्टाईल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्य पदक आलं. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.

पुण्याचा व्हिक्टर सिंह चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढणार
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाईट हरियानाच्या आशिषसोबत आहे. विजय सिंग उत्तर प्रदेशच्या आकाश कुंदीरसोबत तर कुणाल घोरपडे याचा हरियानाच्याच दीपकसोबत सामना होईल. महाराष्ट्राचे अंतिम सामन्यात उतरणारे सर्व बॉक्सर हे पुण्याचे आहेत.

टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत महाराष्ट्राला सुवर्णपदक
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दीया चितळेने आज पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं. तिनं दिल्लीच्या लतिका नारंग हिचा पराभव केला. उद्या (सोमवारी) दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपित पाटीलचा कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.

पदकतालिका-

राज्य सुवर्ण कांस्य रौप्य एकूण
महाराष्ट्र 40 35 29 104
हरियाणा 39 34 42 115
कर्नाटक 21 14 22 57


(ही आकडेवारी आज सायंकाळी 6.10 वाजताची आहे.)