बंगळुरू: महेंद्रसिंग धोनीनं आधी अंबाती रायुडू आणि मग ड्वेन ब्राव्होच्या साथीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या आक्रमणावर चढवलेल्या हल्ल्यानं, चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक सनसनाटी विजय मिळवून दिला.

चेन्नईनं या सामन्यात बंगलोरवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली.

या सामन्यात बंगलोरनं चेन्नईला विजयासाठी 206 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं.

अंबाती रायुडू आणि धोनीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीनं चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मग धोनी आणि ब्राव्होनं अवघ्या 11 चेंडूंत 32 धावा ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रायुडूनं तीन चौकार आणि आठ षटकारांसह 82 धावांची खेळी उभारली. धोनीनं एक चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70, तर ब्राव्होनं नाबाद 14 धावांची खेळी केली.

त्याआधी बंगळुरुने सलामीवीर डीकॉकच्या 53 आणि एबी डिव्हिलियर्सच्या 30 चेंडूत तुफानी 68 धावांच्या जोरावर 20 षटकात 205 धावा केल्या.

डिव्हिलियर्सने लौकिकाला साजेशी खेळी करत, 8 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने अवघ्या 30 चेंडूत 68 धावा कुटल्या.

याशिवाय मनदीप सिंहने 17 चेंडूत 32 आणि कर्णधार विराट कोहलीने 15  चेंडूत 18 धावा ठोकल्या.