लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड संघामधला दुसरा कसोटी सामना आज लॉर्डसवर खेळवला जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं एजबॅस्टनची पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर लॉर्डस कसोटीत टीम इंडियासमोर मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असेल.


क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना खेळवला जाणार आहे. एजबॅस्टन कसोटीत फलंदाजांची ढिसाळ कामगिरी हेच भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता टीम इंडियाचे शिलेदार फलंदाजीत फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यामुळे लॉर्डस कसोटीत टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधायची असेल तर फलंदाजांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.


शिखर धवन परदेशात अपयशी


सलामीवीर शिखर धवन परदेशी खेळपट्ट्यांवर सातत्यानं अपयशी ठरत आहे. घरच्या मैदानावर धावांच्या बाबतीत गब्बर असलेल्या धवनला इंग्लंडमध्ये एकेक धावेसाठी झगडावं लागतं आहे. इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यातल्या दोन्ही डावात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. तर एजबॅस्टनवर दोन्ही डावात धवनच्या बॅटमधून केवळ 39 धावाच निघाल्या. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही धवनच्या या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली.


मुरली विजय, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणेकडूनही निराशा


धवनप्रमाणेच मुरली विजय, लोकेश राहुल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाही लौकिकास साजेशी करता आलेली नाही. अजिंक्य रहाणेच्या कामगिरीचा विचार केल्यास गेल्या सात कसोटीत त्याला 10.72 च्या सरासरीनं केवळ 118 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे भारतीय उकर्णधाराचा फॉर्म ही भारतीय संघाच्या दृष्टीनं चिंतेची बाब ठरली आहे. 2014 च्या लॉर्डस कसोटीत अजिंक्य रहाणेनं शतक झळकावलं होत. तोच रहाणे येत्या लॉर्डस कसोटीत चार वर्षापूर्वीच्या त्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल.


गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीच अपेक्षा


दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय गोलंदाजी परदेशी खेळपट्ट्यांवर सातत्यानं प्रभावी ठरली आहे. कसोटी क्रिकेट जिंकण्यासाठी गोलंदाजांनी सामन्यात वीस विकेट काढणं अपेक्षित असतं. भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या मागच्या चारही कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तशी किमया करुन दाखवली आहे. पण गोलंदाजांच्या या प्रयत्नांना फलंदाजांची यशस्वी साथ न लाभल्यानं त्या चारपैकी केवळ एकच सामना टीम इंडियाला जिंकता आला होता. त्यामुळे भारतीय फलंदाजीत सुधार घडवून आणणं हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार कोहलीसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.


पुजारा, कुलदीपला संधी?


लॉर्डस कसोटीच्या दृष्टीनं भारतीय संघव्यवस्थापनाकडून संघात बदल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. टवेन्टी ट्वेन्टी तसेच वन डे मालिकेत आपल्या चायनामन गोलंदाजीनं प्रभाव पाडणारा कुलदीप यादव आणि चेतेश्वर पुजारा यांचा अंतिम अकरात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. एकूणच लॉर्डसच्या दुसऱ्या लढाईत ज्यो रुटच्या इंग्लिश फौजेला आव्हान देण्यासाठी टीम इंडिया काय रणनिती आखते हे महत्त्वाचं असेल.


इंग्लंडच्या संघातही बदलाची शक्यता


इंग्लंड संघातून डेविड मालानला बाहेर करण्यात आलं आहे. तर बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंड संघात पोकळी निर्माण झाली आहे. लॉर्डवरील धावपट्टी पाहिल्यानंतर दोन स्पिनरसह खेळायचं की नाही याचा निर्णय ज्यो रूटला घ्यायचा आहे.


आदिल राशिदच्या जोडीला मोईन अलीला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या कसोटीत अश्विनची गोलंदाजी इंग्लंडच्या खेळाडूंसाठी डोकेदुखी बनली होती. त्यामुळे अश्विनचं आव्हान पेलण्यासाठी 20 वर्षीय ओलिवर पोपला इंग्लंड संधी देऊ शकतं. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि सॅम करन इंग्लंडच्या जलद गोलंदाजीची धुरा सांभाळतील.