गुवाहाटी : शिमरॉन हेतमायरनं झळकावलेल्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजनं गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजनं दमदार फलंदाजी करताना मर्यादित 50 षटकांत आठ बाद 322 धावांचा डोंगर उभारला.


विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेतमायरनं आपल्या कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. त्याने 78 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. सलामीवीर कायरन पॉवेलनही 39 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांचं योगदान दिलं.


भारताकडून लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन तर खलील अहमद एक विकेट घेतली.


टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. 19 धावांवर विडींजला पहिला झटका बसला. त्यानंतर 86 धावांवर विडींजच्या 3 विकेट घेण्या भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. मात्र त्यांतर हेतमायरनं विडींजची धुरा आपल्या खांद्यावर घेत, संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला.


हेतमायरनं पाचव्या विकेटसाठी रोवमन पॉवेलसोबत 74 धावांची आणि कर्णधार जेसन होल्डरसोबत सातव्या सहाव्या विकेटसाठई 60 धावांची भागिदारी केली. शेवटच्या काही षटकांत विडींजच्या फलंदाजांनी तडाखेबाज खेळी केली. देवेंद्र बिशूने 22 आणि केमार रोचने 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.