धरमशाला : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने धरमशाला वन डेत श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण घातलं. श्रीलंकेने टीम इंडियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी अवघं 113 धावांचं लक्ष्य होतं. श्रीलंकेने 21 व्या षटकांत, अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात ते आव्हान पार केलं. त्यात सलामीच्या उपुल थरंगाचा 49 धावांचा वाटा मोलाचा ठरला.
त्याआधी, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा 112 धावांत खुर्दा उडवला. या सामन्यात भारताचे पहिले सात फलंदाज 29 धावांत माघारी परतले होते. त्या परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने एक खिंड लढवून भारतीय संघावर नीचांकाची लाजिरवाणी वेळ येऊ दिली नाही.
धोनीने 10 चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. धोनीने कुलदीप यादवच्या साथीने आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर तळाच्या जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलच्या साथीनेही त्याने आणखी 42 धावांची भर घातली.
श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने 13 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. नुवान प्रदीपने दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली.